Nigeria News : नायजेरियात चेंगराचेंगरीच्या दोन घटना, ३२ ठार

Nigeria News – नायजेरियात ख्रिसमसनिमित्त भेटवस्तूंच्या वाटपाच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या १३ वरून वाढून ३२ झाली आहे. मृतांमध्ये किमान ४ लहान मुलांचाही समावेश आहे. दारिद्र्याने ग्रासलेल्या जनतेला ख्रिसमसनिमित्त मोफत अन्नपदार्थ वाटप सुरू झाल्यामुळे ही प्रचंड चेंगराचेंगरी झाली, असे पोलिसांनी सांगितले.
नायजेरियाच्या अग्नेयेकडील अनांब्रा प्रांतातल्या ओकिजा शहरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये २२ जण ठार झाले. शनिवारी काही समाजसेवी संघटनांनी अन्न वाटपाचा कार्यक्रम येथे आयोजित केला होता. तर चेंगराचेंगरीची दुसरी घटना राजधानी अबुजामध्ये घडली. तेथे १० जण ठार झाले. स्थानिक चर्चच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे स्थानिक पोलिस प्रवक्ते तोचुकवू इकेंगा यांनी सांगितले.
या दोन्ही घटनांचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे. काही दिवसांपुर्वी नायजेरियात झालेल्या अशाच चेंगराचेंगरीमध्ये अनेक मुले ठार झाली होती. नायजेरियामध्ये स्थानिक संघटना आणि चर्चच्या माध्यमातून ख्रिसमसच्या निमित्ताने धर्मादाय कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ लागले आहे.
त्यावेळी अशी चेंगराचेगरी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मोफत खाद्यपदार्थ मिळण्याच्या आशेने चर्चच्या प्रवेशद्वारापाशी शेकडोंची गर्दी जमा होत असते. चेंगराचेंगरीमुळे अधिकाऱ्यांना अशा कार्यक्रमांमध्ये सुरक्षा उपाय लागू करण्याची मागणी वाढली आहे. नायजेरियन पोलिसांनी देखील आयोजकांना अशा कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य केले आहे.





