साईबाबा चरणी भक्ताकडून 31 लाखांची कार अर्पण

शिर्डी – साईबाबा संस्थानला भक्त नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे दान करत असतात. त्यातच देशातली वाहन क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेली कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा उत्पादित होणारी पहिली गाडी साईचरणी दान करत असते. नुकतेच महिंद्रा ग्रुपच्या वतीने पंधरावी कार साईचरणी दान करण्यात आली आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीला महिंद्रा उद्योग समूहाकडून 31 लाख किमतीची “एक्सयूव्ही 700 एएक्स-7′ या श्रेणीतील गाडी देणगी स्वरूपात प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांनी दिली. नुकतीच महिंद्रा प्रेसिडेंट विजय नाकारा किसवे यांच्याकडे संबंधित गाडीची चावी सुपूर्द केली. यावेळी गाडीची विधिवत पूजा देखील करण्यात आली.
आतापर्यंत चौदा कार दान
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक जगदीशचंद्र महिंद्रा आणि कैलासचंद्र महिंद्रा यांनी साईचरणी ही कार भेट दिली आहे. त्यांनी आतापर्यंत साईबाबा संस्थानला विविध प्रकारची 14 वाहने भेट दिली आहेत. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीला महिंद्राकडून यापूर्वी व्हायोजर, बोलेरो, स्कॉर्पिओ, झायलो, लोगान, मॅक्सिमो,
युवराज (ट्रॅक्टर), एक्सयूव्ही 500, एक्सयूव्ही 300, मराझो, थार असे विविध श्रेणीतील एकूण 12 चार चाकी वाहने आणि 2 दुचाकी वाहने देणगी स्वरूपात देण्यात आली आहेत. आता महिंद्रा एक्सयूव्ही 700 ए.एक्स 7 एटी या श्रेणीतील जवळपास 31 लाख किमतीची गाडी देणगी स्वरूपात दिली आहे.





