California : कॅलिफोर्नियातील वणव्यामुळे 30 हजार लोकांचे स्थलांतर

लॉस एंजेलिस : लॉस एंजेलिसच्या डोंगराळ भागामध्ये भडकलेल्या वणव्यामुळे सुमारे ३० हजार लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. वणव्याची आग दक्षिण कॅलिफोर्नियातील सेलिब्रिटींच्या घरांकडे सरकू लागली आहे.स्थलांतर करत असलेल्या लोकांच्या वाहनांमुळे रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेक लोक आपली वाहने मागे सोडून पायी निघाले आहेत.
आगीमुळे १३ हजार घरांना धोका निर्माण झाला असून या घरांमधील २६ हजार लोकांनी स्थलांतर केले आहे, असे लॉस एजेलिसच्या फायर डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी सांगितले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंगळवारी आगीने रौद्र रुप धारण केले होते. डोंगरमाथ्यावर आणि पायथ्यापाशीही हा सोसाट्याचा वारा आणखी काही दिवस तरी कायम राहणार असून याकाळात वाऱ्याचा वेग ताशी १६० किमोमीटर असण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे वाळलेल्या झाडांमध्ये आग लगेचच पसरते आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास ५ लाख वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. लॉस एंजेलिसच्या पश्चिमेकडील पॅसिफिक, पॅलिसेड भागात जवळपास २ चौरस मैल परिसरात आग पसरली आहे. वेनिस बीचच्या रहिवाशांनाही आगीच्या ज्वाळा लांबूनच दिसत आहेत. वणवा भडकलेल्या मार्गावर मदत आणि बचाव कामासाठीच्या वाहनांना अडथळे येऊ नयेत म्हणून अनावश्यक वाहतूक बंद केली गेली आहे.





