Nanded : नांदेडमध्ये दूषित पाण्यामुळे ३०० ग्रामस्थांना विषबाधा; ६ जणांची प्रकृती गंभीर

नांदेड – नांदेडमधील नेरली कुष्ठधाम (तालुका नांदेड) येथे दूषित पाणी आल्यामुळे अनेक रुग्णांना उलट्या व मळमळ होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते.
जवळपास ३०० रुग्णांना याचा फटका बसला असून ६ जण गंभीर असल्याची माहिती गावक-यांनी दिली आहे. बाकीच्या रुग्णांवर गावातच शासकीय रुग्णालयातील कर्मचारी उपचार करत आहेत.
नेरली (तालुका नांदेड) या गावात पिण्याच्या पाण्याची टाकी दूषित असल्याच्या कारणामुळे पाण्यातून विषबाधा झाली असावी त्याचबरोबर पाण्याचे शुद्धीकरण न केल्यामुळे नागरिकांना पाण्यातून विषबाधा झाली असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे. गावामध्ये जवळपास सर्वच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.





