‘आरोग्य विभागात ३ हजार २०० कोटींचा घोटाळा’; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबई – सध्या राज्यात घोटाळ्यांचे सत्र काही थांबता थांबत नाही. प्रत्येक मंत्री तिजोरी लुटण्याच्या तयारीत आहे. अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेली महायुती सरकार फक्त तिजोरी साफ करण्याचे काम करत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा कारभार यापूर्वी देखील आम्ही चव्हाट्यावर आणला आहे.
आता पुन्हा स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागात ३२०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी केला आहे. घोटाळा झाल्याचा दावा करताना त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली आहेत.
वडेट्टीवारांनी म्हटले की, राज्यात सध्या केवळ सरकारी तिजोरी साफ करण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार यापूर्वी देखील आम्ही चव्हाट्यावर आणला आहे. आता स्वच्छतेच्या नावाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात ३,२०० कोटींचा घोटाळा झाला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे हे स्वच्छतेचे टेंडर तातडीने रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. वडेट्टीवार म्हणाले, २१ एप्रिल २०२२ रोजी स्वच्छतेच्या टेंडरच्या प्रक्रीयेसाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती.
राज्यातील आठ सर्कलमध्ये २७ हजार ८६९ बेडना प्रशासकीय मान्यता घेऊन स्वच्छतेच्या घोटाळ्याला सुरूवात केली गेली. पूर्वी ही प्रशासकीय मान्यता केवळ ७७ कोटी ५५ लाख १८ हजार रूपयांची होती. सत्ताधारी पक्षाच्या संबंधित लोकांनी हा उद्योग हातात घेतला, ही मान्यता ६३८ कोटींनी १८ सप्टेंबर २०२३ रोजी वाढ करून घेतली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, इतर सामान्य आरोग्य केंद्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला.





