दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न दिल्ली सतर्कतेमुळे हाणून पाडला. या प्रकरणी इस्लामिक स्टेट्सच्या तीन जणांना आसामच्या गोपाळपुरा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अतिसंहारक स्फोटके आणि दूरनियंत्रके जप्त करण्यात आली.
पोलिस उपायुक्त प्रमोद खुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम आणि दिल्ली पोलिसांनी राबविलेल्या संयुक्त मोहीमेत आसाममधील गोपाळपुरा जिल्ह्यातून तीन संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते इस्लामिक सटेट्रस्शी संबंधित असावेत, अशी शक्यता आहे. त्यांच्याकडून स्फोटासाठी वापरली जाणारे दूरनियंत्रके आणि एक किलो अतिसंहारक स्फोटके जप्त करण्यात आली.
त्यामुळे मोठा कट उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे.
हे तीनही जण आसामची राजधानी गुवाहाटी येथील रहिवासी आहेत. मुक्कदर इस्लाम, रणजीत अली, लेवीस झमील जमाल अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून शक्तीशाली दूरनियंत्रके जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडे स्फोटकांचा साठाही सापडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या तिघांचा गोपाळपुरा येथे रास मेळ्यात स्फोट घडवण्याच कट होता. तो पूर्ण झाल्यानंतर दिल्लीतील वर्दळीच्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा कट त्यांनी आखला होता. त्यातील झमील हा आसाममधील आधार केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होता. मुकद्दर हा वाहन चालक आहे. तर रणजित हा एका मासे विकणाऱ्या कंपनीत व्यवस्थापक होता.
या तिघांचा ताबा आसाम पोलिसांकडे आहे. त्यांना दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. तपासातून आणखी काही कट उघड होण्याची शक्यता असून त्यांच्या हॅंडलरचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.
दरम्यान हे तिघे वर्ग मित्र असून त्यांनी दिल्लीतील काही जणांना धर्मांध बनवल्याचे तपासात पुढे येत आहे, असे वृत्त पीटीआय या वृत्त संस्थेने दिले आहे.





