पिंपरी | मावळ विधानसभेत ३ लाख ८० हजार मतदार

वडगाव मावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने राज्य विधानसभा निवडणूकीची घोषणा केल्यानंतर वडगाव मावळ येथे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले,
तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत मावळ विधानसभा मतदारसंघाबाबत महत्वाची माहिती दिली.
मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख ८० हजार २९७ मतदारसंख्या असून, ४०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले आहे.
मावळ विधानसभेसाठी वडगाव येथील तहसील कार्यालयात दि. २२ ते २९ ऑक्टोबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात येतील. दि. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होइल, तर ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून त्यानंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
तसेच २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तळेगाव येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्व मतपेट्या सुरक्षित ठेवल्या जातील आणि २३ नोव्हेंबर रोजी इथेच मतमोजणीची प्रक्रियाही पार पडणार आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघ आकडेवारी
मतदारसंघामध्ये १ लाख ९४ हजार ८३३ पुरुष मतदार
मतदारसंघामध्ये १ लाख ८५ हजार ४५९ महिला मतदार
मतदारसंघामध्ये इतर (तृतीयपंथीय) १३ मतदार
मावळ विधानसभेत एकूण ३ लाख ८० हजार २९७ मतदार
मतदारसंघात एकूण ४०२ मतदान केंद्र





