US nightclub shooting : अमेरिकेतल्या नाइट क्लबमधील गोळीबारात ३ ठार तर, १४ जण जखमी
टेक्सासमधील ऑस्टिन येथील एका लोकप्रिय नाईटलाइफ क्लबमध्ये रविवारी पहाटे झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आणि किमान १४ जण जखमी झाले.

US nightclub shooting : टेक्सासमधील ऑस्टिन येथील एका लोकप्रिय नाईटलाइफ क्लबमध्ये रविवारी पहाटे झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आणि किमान १४ जण जखमी झाले, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले.
मरण पावलेल्यांमध्ये बंदूकधारी व्यक्तीचाही समावेश होता. ही घटना रात्री २ वाजण्याच्या सुमारास पश्चिम सहाव्या स्ट्रीटवरील बुफोर्डच्या बॅकयार्ड बिअर गार्डनमध्ये घडली. अनेक युवक या ठिकाणी आठवड्याच्या शेवटी मौजमजा करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
एका संशयिताने लांब रायफल आणि पिस्तूलने गोळीबार केला. ऑस्टिन पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या आपत्कालीन कॉलच्या एका मिनिटातच प्रतिसाद दिला आणि संशयिताला घटनास्थळीच गोळ्या घालून ठार मारले.
दोन नागरिक आणि बंदूकधारी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या १४ जणांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे स्थानिक रुग्णालयात सांगण्यात आले आहे. हल्ल्याचा हेतू अद्याप अज्ञात आहे आणि बळींची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही.





