पुणे – सोन्या मारूती चौक परिसरातील सराफ बाजारात मुंबईतील सराफाकडील तीन किलो सोने ठेवलेली पिशवी दोन महिलांनी लांबविल्याची घटना शनिवारी घडली. याबाबत जिग्नेश बोराणा (वय ३३, रा. मुंबई) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन महिलांसह एका अल्पवयीन मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोराणा सराफ व्यावसायिक आहे. पुण्यातील सराफ बाजारातील सराफांना ते सोने विक्री करतात. शनिवारी दुपारी ते सराफ बाजारातील मित्राच्या पेढीत आले होते. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत प्लास्टिकच्या खोक्यात तीन किलो सोने होते. त्यावेळी सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने दोन महिला आल्या. त्यांच्या बरोबर एक अल्पवयीन मुलगा होता. बोराणा यांचे लक्ष नसल्याची संधी साधून महिलांनी सोने ठेवलेली प्लास्टिकचे डबे लांबविले.
पिशवीतील प्लास्टिकचे डबे लांबविण्यात आल्याचा प्रकार काही वेळानंतर निदर्शनास आल्यानंतर बोराणा यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. सराफी पेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.