पुणे : पुण्यातील निगडी परिसरात एका टेलिकॉम कंपनीत घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी दुपारी ऑप्टिकल फायबर केबलच्या कामासाठी डक्टमध्ये उतरलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लखन ढवारे (32), साहेबराव गिरसेट (36) आणि दत्ता होनाळे (38) अशी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या घटनेनंतर निगडी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नेमकं काय घडलं? निगडीतील एका इमारतीत ऑप्टिकल फायबर केबलच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी चार कंत्राटी कामगार गेले होते. शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास लखन ढवारे, साहेबराव गिरसेट आणि दत्ता होनाळे या तिघांनी डक्टमध्ये प्रवेश केला. सुमारे 10 फूट खोल असलेल्या या डक्टमध्ये पाणी साचले होते, ज्यामुळे विषारी वायू तयार झाला होता. या वायूमुळे तिघांचा श्वासोच्छवास गुदमरला आणि त्यांचा मृत्यू झाला. चौथा सहकारी बाबासाहेब वाघ हा डक्टमध्ये उतरला नव्हता. त्याने सांगितले, आम्ही डक्टचे झाकण उघडले आणि थोडा वेळ थांबलो. साहेबराव गिरसेट प्रथम डक्टमध्ये उतरला, पण त्याला अस्वस्थ वाटले. त्याला मदत करण्यासाठी दत्ता होनाळे डक्टमध्ये गेला. दोघेही प्रतिसाद देत नसल्याने लखन ढवारे त्यांना वाचवण्यासाठी डक्टमध्ये उतरला. पण तिघेही बेशुद्ध झाले. मला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले, म्हणून मी तात्काळ स्थानिकांना आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाला कळवले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी आणि अग्निशमन दलाने तिन्ही कर्मचाऱ्यांना डक्टमधून बाहेर काढले. त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला. निगडी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले, आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.