जागतिक दर्जाचे दुसरे जलपर्यटन केंद्र कोयनेत होणार; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती

कोयनानगर (प्रतिनिधी) : तांत्रिक अडचणीमुळे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या ५ किलोमीटर परिसरात बोटिंग स्पॉट करायला अडचण असली तरी धरणाच्या भिंतीपासून पुढे हेळवाक, रासाटी, येराड, पापरडे या ठिकाणी बोटिंग स्पॉट करायला मान्यता देण्यात आली आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र याठिकाणी उभे राहणार असून यामुळे स्थानिकांच्या विकासाला चालना मिळणार आहॆ, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे सर्वाधिकार दिले असून याबाबतची निविदा काढून लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोयना धरणातील पाण्याचे जलपूजन झाल्यानंतर कोयना जलपर्यटनासाठी निवडलेल्या जागांची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता विलास नाईक, प्रांताधिकारी सोपान टोम्पे,तहसीलदार अनंत गुरव, कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सावळाराम लाड, अशोकराव पाटील,अजय देसाई आदी प्रमुख उपस्थीत होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की कोयना विभागामध्ये हेळवाक ,रासाटी ,येराड ,पाटण ,पापर्डे याठिकाणी बोटिंग स्पॉट विकसित करणार आहॆ. त्या सर्व बोटिंग स्पॉटची ब्लू प्रिंट तयार केली आहॆ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत याला मान्यता दिली असून पुढील सर्वाधिकार आपल्याला दिले आहेत. त्यामुळे याबाबतची शॉर्ट नोटीस काढून निविदा करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोयना धरणात 103.40 टीएमसी पाणीसाठा झाल्यावर प्रथेप्रमाणे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते कोयना धरणातील पाण्याचे पूजन व ओटीभरण कार्यक्रम पार पडला आहे.






