मुसळधार पावसामुळे अडकलेल्या पर्यटकांची रेस्क्यू टीमकडून सुटका

कार्ला – मावळ तालुक्यात कोसळणाऱ्या वरुणराजाने रौद्ररुप धारण केले असून मावळ तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे कार्ला इंद्रायणी नदी दुथडी भरुन वाहत असून पूरसदृश्य परिस्िथती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पावसामुळे पर्यटक अडकले होते.
शिवदुर्ग रेस्क्यु टीमने मदतीला धावून येत दुपारपर्यंत एकूण २९ पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले आहे. मळवली,बोरज, सदापूर, देवले भागातील अनेक रहिवासी सोसायटीमध्ये पाणी शिरले असून भाजे हद्दीतील संपर्क बालग्राम पाठीमागे असणा-या बंगल्यामध्ये २२ पर्यटक तर कार्ला येथे ७ पर्यटक अडकले होते.
त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यु टीम महेश मसने, योगेश दळवी, सागर दळवी, अजय मयेकर, आदिती गायकवाड , सुनिल गायकवाड, सागर कुंभार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नवजीवन जाधव, पोलीस हवालदार सिताराम बोकड, विजय मुंडे, संतोष वाडेकर, रोहित गायकवाड यांंच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांनमुळे ते सुखरुप बाहेर काढण्यात आले.
यावेळी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, मंडल अधिकारी आशा धायगुडे, तलाठी दिपक धनवडे, सुप्रिया कावरे, उपसरपंच विकास वाल्हेकर ,पोलीस पाटील उज्वला आंभुरे, शहाजान इनामदार, सुभाष साठे यांनी भेट दिली.
मावळ तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. लोणावळा, कार्ला परिसरात कोसळणाऱ्या पावसाने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक रस्ते देखील पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तसेच कार्ला, सदापुर, पाथरगाव, कामशेत, बोरज, मळवली देवले या भागात तर नदीचे पाणी मर्यादा ओलांडून पात्राबाहेर वाहताना दिसत आहे. नदीकाठच्या घरामध्ये तसेच मळवली परिसरात अनेक सोसायट्याच्या परिसरात व घरामध्ये पाणी शिरले होते.
हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज पाहता येत्या चोवीस तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे, तसेच नदीपात्रात देखील धरणातून पाणी सोडणार असल्याने आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे अन्यथा घरी थांबावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





