पिंपरी | वाघोलीतील तरुणाला साडे 29 लाखांचा गंडा

वाघोली, (प्रतिनिधी)- तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची केस आहे तुम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी भीती दाखवून तरुणाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसी कारवाईची भीती दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाघोली येथील 33 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार 29 मार्च 2024 रोजी घडला आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी फोन केला. तुमचे नाव मनी लॉन्डरिंगमध्ये असल्याने पार्सल कस्टम विभागाकडे अडकले आहे. तसेच त्यात अवैध अमली पदार्थ सापडले आहे.
तुमच्या नावाचा गैरवापर केला जात असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर करून मनी लॉन्डरिंग करण्यात आली आहे, असे सांगून एक लिंक पाठवत तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यांनतर पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल असे सांगून अटकेची भीती दाखवली.
तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगत तक्रारदार यांना 29 लाख 49 हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.





