Jamkhed News : रत्नापुर परीसरातील शेतातुन २ लाख कीमतीची २७ किलो गांजाची झाडे जप्त

जामखेड : जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील एका शेतातून दोन लाख रुपयांच्या किमतीची २७ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी अटकेत असलेल्या आरोपीच्या चौकशीतून ही माहिती समोर आल्याने पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड शहरात व तालुक्यात अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांचे पथक सक्रिय आहे. दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निलोन उर्फ कव्या धनसिंग पवार (वय ४२ वर्षे) याला अटक केली होती. त्याच्याकडून १ लाख ९८ हजार १०० रुपयांच्या किमतीचा २८.३० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. चौकशीदरम्यान निलोन पवारने रत्नापूर परिसरातील विजय अशोक ढवळे यांच्या शेतात आणखी गांजाची झाडे लावलेली असल्याची कबुली दिली.
या माहितीवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रत्नापूर येथे छापा टाकला. विजय ढवळे यांच्या शेतात सापडलेल्या २७ किलो वजनाच्या आणि सुमारे २ लाख रुपयांच्या किमतीच्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली. यामुळे अवैध गांजा उत्पादनाचा एक मोठा नेटवर्क उघडकीस आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सदर कारवाईत पोलिस नायक शामसुंदर जाधव यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात मुख्य आरोपी म्हणून निलोन उर्फ कव्या धनसिंग पवार (वय ४२ वर्षे) आणि निशा नितीन पवार (वय ३२ वर्षे), दोन्ही राहणार कुंभार गल्ली, गोरोबा टॉकिज जवळ, जामखेड यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलिस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलिस कॉन्स्टेबल योगेश दळवी, सोनवणे, ईश्वर माने आणि भागीरथ देशमाने यांच्या पथकाने केली आहे.





