येत्या 10 दिवसांत 2600 श्रमिक विशेष रेल्वे गाड्या

मुंबई – परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात परत जाता यावे म्हणून रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारच्या गरजेनुसार पुढील दहा दिवसांत आणखी 2600 श्रमिक विशेष गाड्या चालविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे 36 लाख स्थलांतरितांना होण्याची अपेक्षा आहे.
लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना सोडण्यासाठी भारतीय रेल्वेने 1 मे पासून श्रमिक विशेष गाड्या चालविण्यास सुरुवात केली. अशा अडकलेल्या लोकांना परत पाठविण्यासाठी संबंधित दोन्ही राज्य सरकारांच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या त्या विशिष्ट स्थानकादरम्यान चालविल्या जात आहेत.
गेल्या 23 दिवसांत भारतीय रेल्वेने 2600 श्रमिक विशेष गाड्या चालविल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 36 लाख अडकलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पोहचविले आहे. श्रमिक विशेष गाड्यांव्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयाने 12 मे पासून विशेष गाड्यांच्या 15 जोड्या सुरू केल्या आहेत आणि 1 जूनपासून 200 रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.





