26/11 Mumbai Attack : मुंबई दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण! मुख्यमंत्री फडणवीसांकडून शहीदांना श्रद्धांजली अर्पण
26/11 Mumbai Attack : हल्ल्यानंतर शहराच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल, पण...

26/11 Mumbai Attack : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 18 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित औपचारिक परेडमध्ये सहभागी होऊन हल्ल्यात प्राण गमावलेल्या सुरक्षा रक्षकांना आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीट करत, “26/11, क्रूरतेची काळरात्र! मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना, आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीरपुत्रांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली” अशी पोस्ट शेअर केली आहे.
या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली देण्यासाठी मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतानाच मुंबई हल्ल्यातील शहीदांचं स्मरण करून आदरांजली वाहिली.
“हा दिवस आपण कधी विसरू शकत नाही”
“हा हल्ला ताज हॉटेल, ट्रायडेंट, सीएसटीवर नव्हता, हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर होता. भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न होता. हा भारताच्या संविधानावर हल्ला होता. कसाब पकडला गेला म्हणूनच संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा बुरखा फाडता आला. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असल्याचं आपण जगासमोर आणू शकलो. म्हणूनच हा दिवस आपण कधी विसरू शकत नाही. यापुढे कधीही असा हल्ला आपल्याला होऊ द्यायचा नाही,” असे फडणवीस म्हणाले.
” पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आपलं रौद्ररूप दाखवून दिलं”
“गेल्या १२ वर्षांत मुंबई किंवा देशात दहशतवादी घटना पूर्णपणे संपल्या आहेत. काही प्रयत्न झाले, पण तेही परतवून लावण्यात आले. आपले पोलीस व आपल्या जवानांच्या मदतीने एक सुरक्षित भारत आपण तयार केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ज्याप्रकारे भारतानं आपलं रौद्ररूप दाखवून दिलं, त्यातून भारत हे हल्ले सहन करणार नाही, पाकिस्तानात घुसून अशा हल्ल्यांचा सूड घेईल हे आपण दाखवून दिलं,” असा उल्लेखही फडणविसांनी केला.
दरम्यान, समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह १६६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. जिवाची पर्वा न करता लढलेल्या पोलिस जवानांनी ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालत, अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडले. त्याला फासावर चढवण्यात तपास यंत्रणांना यश आले. या हल्ल्यात १८ पोलिस जवानांना वीरमरण आले.
LIVE | 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली
🕤 स. ९.३५ वा. | २६-११-२०२६📍गेटवे ऑफ इंडिया, मुंबई.
#Maharashtra #Mumbai #2611Heroes https://t.co/yYtz9Kx0aI
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 26, 2026
हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल
या हल्ल्यानंतर देशाच्या दहशतवादविरोधी सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर राज्यात विशेष प्रशिक्षणप्राप्त कमांडो दल म्हणून ‘फोर्स वन’ची स्थापना करण्यात आली. तसेच शीघ्रकृती दल अधिक सक्षम करण्यात आले. मुंबई पोलिस दलालाही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अन्य तांत्रिक सुविधांनी सज्ज करण्यात आले.
संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा, सागरी गस्त आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नियमित सरावावर भर देण्यात आला. या हल्ल्यानंतर शहराच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यात आले असले, तरी दहशतवादाचे सावट पाहता सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज ठेवण्याचे आव्हान कायम आहे.
हेही वाचा :





