Bhosari : श्री भैरवनाथांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक; भोसरी गावात २८ नोव्हेंबरला मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा
धार्मिक परंपरेनुसार मंत्रोच्चार आणि विधिवत पूजा करून मूर्तीची स्थापना केली जाणार

भोसरी – भोसरी गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारा श्री भैरवनाथ मंदिरातील नवीन मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवार, (दि. २८) रोजी पार पडणार आहे.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २५) गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक फुलांनी सजविलेला बैलगाडा रथ, नाचणाऱ्या घोड्या, वारकऱ्यांचे भजन, पारंपरिक मशाली आणि ब्रास बँडच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली. बापूजी बुवा चौक, लांडगे आळी, लांडगे लिंबाची तालीम, धावडे आळी येथील महादेव मंदिर, फुगे-माने तालीम आदी परिसरातून मार्गक्रमण करत मिरवणूक पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली.
त्यानंतर भैरवनाथ मंदिर, महादेव मंदिर लांडगे आळी, विठ्ठल मंदिर, मारुती मंदिर, लक्ष्मीआई मंदिर, अग्निशमन दल, भाजी मार्केट, भगवान गव्हाणे चौक आणि चांदणी चौक परिसरातून मिरवणूक मार्गस्थ झाली.
मिरवणुकीतील प्रमुख आकर्षण पैलवान हिरामण लांडगे (भोसरी) यांच्या बैलगाड्याचा फुलांनी सजविलेला रथ ठरला. आंबेगाव येथील चिराग हॉर्स यांच्या नाचणाऱ्या घोड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पुणे येथील मयूर ब्रास बँडच्या वादनाने मिरवणुकीत उत्साहाची भर पडली. तसेच आळंदी येथील संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेचे वारकरी सहभागी झाले होते.
संस्थेचे संस्थापक शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांनी भजन आणि अभंग सादर केले. पारंपरिक मशालींचाही मिरवणुकीत समावेश होता. या सोहळ्याच्या नियोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ विशेष मेहनत घेत आहेत. मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पांडुरंग लांडगे, उपाध्यक्ष भानुदास निवृत्ती फुगे, सचिव शेखर लांडगे, विक्रांत लांडगे आणि सुधीर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली विविध नियोजन करण्यात येत आहे.
मिरवणुकीचे व्यवस्थापन, धार्मिक विधींची तयारी आणि ग्रामस्थांचा सहभाग यासाठी मंडळाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मूर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भोसरी गावात उत्साहाचे वातावरण असून, या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक आणि ग्रामस्थ सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धार्मिक सोहळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी
या धार्मिक सोहळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, सन २००० मध्ये जुन्या मूर्तींचे पंढरपूर येथे विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर नवीन मूर्ती पंढरपूर येथील श्रीराम मूर्ती भंडार स्टोन येथून आणण्यात आल्या.
मंदिर परिसरातील उत्खननादरम्यान काही दगडही आढळून आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता नवीन मूर्तीची विधिवत स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे या सोहळ्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ ते ९ या वेळेत मूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठेचा मुख्य धार्मिक विधी पार पडणार आहे. या विधीसाठी सोनारी येथील महंत शामनाथ महाराज उपस्थित राहणार आहेत. तसेच विधी आणि पूजेची जबाबदारी पुरोहित माधव काका तिखे पार पाडणार आहेत. धार्मिक परंपरेनुसार मंत्रोच्चार आणि विधिवत पूजा करून मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.
Hinjewadi Metro : हिंजवडी मेट्रोला बालेवाडीची जोड; दोन नवी स्थानके प्रवाशांच्या सेवेत!





