26/11 चा मास्टरमाइंड तहव्वुर राणा भारतात, पहिला फोटो समोर

नवी दिल्ली – 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा याला अखेर गुरुवारी (१० एप्रिल ) अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. राष्ट्रीय अन्वेषण अभिकरणाच्या (एनआयए) विशेष पथकाने त्याला खास विमानाने दिल्लीत आणले. संध्याकाळी दिल्लीत उतरताच एनआयएने त्याला ताब्यात घेतले आणि त्याचे पहिले छायाचित्रे समोर आले. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणाबाबत सुरू असलेल्या अटकळांना यामुळे पूर्णविराम मिळाला.
पटियाला हाउस कोर्टाबाहेर कडक बंदोबस्त –
तहव्वुर राणाला आता एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पटियाला हाउस कोर्टाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सीआयएसएफसह इतर अर्धसैनिक बलांचे जवान तैनात असून, कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे.
तिहार जेल सज्ज, कोर्टाच्या आदेशाची प्रतीक्षा –
पीटीआयच्या वृत्तानुसार, तिहार जेल प्रशासनाने तहव्वुर राणाला उच्च सुरक्षा वार्डात ठेवण्याची पूर्ण तयारी केली आहे. जेल अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते फक्त कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. ६४ वर्षीय राणा हा पाकिस्तानी वंशाचा कनाडाई नागरिक असून, त्याच्यावर डेविड कोलमॅन हेडली, लष्कर-ए-तैयबा (एलईटी), हरकत-उल-जिहाद-इस्लामी (एचयूजेआय) आणि पाकिस्तानातील इतर दहशतवाद्यांसोबत मिळून २००८ च्या मुंबई हल्ल्याची साजिश रचल्याचा आरोप आहे.

पाकिस्तानचा पळपुटेपणा: ‘आमचा संबंध नाही’ –
पाकिस्तानने गुरुवारी दावा केला की, तहव्वुर राणाचा मुंबई हल्ल्याशी किंवा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. त्यांनी म्हटले की, राणा हा कनाडाचा नागरिक असून, गेल्या दोन दशकांपासून त्याने पाकिस्तानी कागदपत्रे नूतनीकरण केलेली नाहीत. राणा हा मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डेविड कोलमॅन हेडली उर्फ दाऊद गिलानी याचा जवळचा साथीदार मानला जातो, ज्याने या हल्ल्याची आखणी केली होती.
या प्रत्यार्पणामुळे १७ वर्षांनंतर मुंबई हल्ल्याच्या तपासाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. राणाच्या चौकशीतून दहशतवादी कारवायांचे अनेक धागेदोरे उलगडू शकतात, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





