हिंद महासागरातल्या बोटीतून २,५०० किलो ड्रग्ज जप्त; नौदलाच्या आयएनएस तर्कषची यशस्वी कारवाई

मुंबई – आयएनएस तर्कष या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने हिंद महासागराच्या पश्चिम क्षेत्रातील गस्तीदरम्यान २,५०० किलो अमली पदार्थ जप्त केले. नौदलाच्या नौकेद्वारे करण्यात आलेली ही अलिकडच्या काळातली सर्वात मोठी अमली पदार्थ विरोधी कारवाई असल्याचे मानले जाते आहे.
दिनांक ३१ मार्च रोजी गस्तीवर असताना आयएनएस तर्कष युद्धनौकेला भारतीय नौदलाच्या विमानाकडून त्या भागातील संशयास्पद नौकांची माहिती मिळाली.
या नौका अमली पदार्थांच्या तस्करीसह अन्य बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तर्कष युद्धनौकेने आपला मार्ग बदलून संशयास्पद नौकांच्या मार्गात हस्तक्षेप केला.
आसपासच्या सर्व संशयित नौकांची कायदेशीर चौकशी केल्यानंतर मुंबईतील सागरी कारवाई केंद्र आणि विमानाच्या समन्वयाने तर्कषवरील अधिकाऱ्यांनी एका संशयित नौकेवर प्रवेश केला.
याशिवाय तर्कषवरील हेलिकॉप्टरद्वारे संशयास्पद नौकांवरील हालचालींवर देखरेख ठेवण्यात आली व त्या भागातील आणखी अशाच संशयास्पद नौकांचा शोध घेण्यात आला.
सागरी कमांडोंसह विशेष पथकाने संशयास्पद नौकेवर दाखल होऊन शोधमोहीम राबवली. तपासात या नौकांमधील वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या कप्प्यांत २,५०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ सापडले.
यामध्ये २,३८६ किलो हशीश व १२१ किलो हेरोइन होते. या नौकेवर आयएनएस तर्कष युद्धनौकेने यशस्वीरित्या ताबा मिळविला आणि नौकेवरील कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली.





