‘सलमानच्या हत्येसाठी 25 लाखांची सुपारी घेतली होती’; पोलिसांच्या तपासात आरोपींची कबुली

Salman Khan – बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अभिनेत्याच्या हत्येसाठी बिष्णोई टोळीने 25 लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत सलमानला मारण्याचा कट होता. बिश्नोई टोळी अभिनेत्याला मारण्यासाठी पाकिस्तानातून एके-47, एके-92, एम-16 रायफल आणि तुर्की बनावटीची झिगाना पिस्तूल यांसारखी हायटेक शस्त्रे मागवणार होती.
पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची 29 मे 2022 रोजी जिगाना पिस्तुलाने हत्या करण्यात आली होती. 14 एप्रिल रोजी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर पहाटे 5 वाजता गोळीबार झाला होता.
दोन दुचाकींवर आलेल्या हल्लेखोरांनी 5 राउंड फायर केले होते. गोळीबाराच्या वेळी सलमान घरातच होता. या घटनेनंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती.





