इलेक्शन ड्युटीवरुन परतत असताना बस उलटली, 21 पोलीस जखमी

बैतूल (मध्य प्रदेश) – मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस बैतुलमार्गे राजगडला जात असताना नीम पाणी ढाब्याजवळ अचानक ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात बस मधील २१ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. (21 policemen injured in horrific accident while returning from Election duty)
जखमी झालेल्या पोलिसांपैकी १२ पोलिस कर्मचाऱ्यांना शाहपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे, तर नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना बैतूल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमाराला झाला.
अपघाताची माहिती मिळताच बैतुलचे पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह वरीष्ट पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मध्य प्रदेशातील सिधी, शहडोल, जबलपूर, मंडला, बालाघाट आणि छिंदवाडा या सहा लोकसभा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले.हे पोलिस कर्मचारी छिंदवाडा मतदार संघातील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.





