पिंपरी | 2025 च्या गणेशोत्सवाच्या व्यवस्थेची वर्षभर आगोदरच निविदा

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीच्या कालावधीतील अनेक अजब कामांचे व निर्णयांचे अनुभव नागरिक व माजी लोकप्रतिनिधींना येत आहेत.
पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये पवना नदीला येणारा संभाव्य पूर लक्षात घेत त्यामुळे बाधित नागरिकांच्या स्थलांतरासाठी केल्या जाणार्या उपाययोजना करण्याबाबतची 8 लाख 45 हजार 714 रुपयांची निविदा ह क्षेत्रीय कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.
हे अधिकारी एवढ्यावर थांबले नाही तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या शहरातील मुक्कामादरम्यान तसेच पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाकरिता नदीघाटांवरील प्रकाशयोजना व अन्य बाबींचीदेखील निविदा प्रशासनाने प्रसिद्ध करत प्रशासकीय राजवटीतील आपल्या कार्याची चुणूक दाखविली आहे.
लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर गेली अडीच वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासनावर लोकप्रतिनिधींची धाक नाही.
तर राज्य सरकारकडूनही मिळालेल्या मोकळीकीचा प्रशासकीय राजवटीत अधिकार्यांकडून आपल्या अधिकारांचा सढळ हाताने वापर केला जात असल्याचे चित्र पालिकेत पहायला मिळत आहे. गणेश विसर्जनाने सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद सोहळ्याचा समारोप होऊन अवघे काही तास उलटले आहेत.
अनेक मंडळांचे मंडपही काढलेले नाहीत, तर महापालिकेकडून गणेशमूर्तींची योग्य प्रकारे विल्हेवाटदेखील लावलेली नाही.
शहरात असे चित्र असताना पुढील वर्षी म्हणजे 2024-25 साली साजर्या केल्या जाणार्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवश्यक असलेली पवना नदी घाटावरील तसेच मिरवणूक मार्गावर ध्वनिक्षेपक व प्रकाश योजना करण्यासाठी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान करावयाच्या ध्वनिक्षेपक व प्रकाशयोजनेसाठी 8 लाख4 हजार 558 रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाने 2025 साली साजर्या केल्या जाणार्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीकरिता आपल्या हद्दीतील प्रभाग क्र. 20 व 30 मध्ये या महापुरुषांच्या पुतळ्यांवर विद्युत रोषणाई करण्यासाठी 8 लाख, 46 हजार 54 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.
याशिवाय पुढील वर्षी होणार्या मात्र माहिती नसलेल्या सांगवी उपविभागाअंतर्गत विविध कार्यक्रमांच्या नियोजनातील ध्वनीक्षेपक, जनित्र, प्रकाशव्यवस्था व सीसीटीव्ही यंत्रणेच्या नियोजनाकरिता 8 लाख, 46 हजार 993 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.
दरम्यान, एकून नऊ विषयांच्या कामांच्या प्रसिद्ध केलेल्या निविदेमध्ये पुढील वर्षातील नियोजनाच्या पाच तर या आर्थिक वर्षातील चार कामांचा समावेश करण्यात आला आहे.
यंदा केल्या जाणार्या कामांमध्ये कासारवाडी उपविभागातील इमारतीमधील वातानुकूलन यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी 8 लाख,46 हजार 881 रुपये, याच विभागातील प्रभाग क्र. 20 मधील इमारती,
शाळा याठिकाणच्या विद्युतीकरणाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी 8 लाख 45 हजार, तर प्रभाग क्रमांक 30 मधील याच कामाकरिता तेवढीच म्हणे 8 लाख, 45 हजार 372 रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सांगवी उपविभागातील हमी कालावधी संपलेल्या एलइडी दिव्यांची दुरुस्ती करण्यासाठी 8 लाख,34 हजार 965 रुपयांचि निविदा पप्रसिद्ध केली आहे.
दरवाढ झाल्यास जबाबदार कोण?
महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाने दूरदृष्टी ठेवून पुढील 2024-25 या सालामधील अनेक कामांच्या 75 लाख, 96 हजार 622 रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, यामधील अनेक कामे करण्यास जवळपास वर्षभराचा कालावधी आहे.
याकालावधीत वस्तुंचे दर वाढल्यास ठेका मंजूर झालेल्या ठेकेदाराने दरवाढीच्या कमेची मागणी केल्यास याची जबाबदारी संबंधित अधिकारी घेणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
त्यामुळे पुढील वर्षातील कामाकरिता एवढी तत्परता ह क्षेत्रीय कार्यालयाकडून का दाखविली जात आहे, याची चर्चा रंगली आहे.





