nagar | अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नगर, (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल प्रकाश बाबूराव कडूसकर (वय ४१, रा. डोंगरवाडी, ता. पारनेर) याला २० वर्षे सक्तमजुरी आणि ९ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वैशाली राहुल राऊत यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
प्रकाश कडूसकर याने मार्च २०२२ पासून ते दि. १३ जुलै २०२२ पर्यंत मुलीला खाऊ देण्याचे बहाण्याने बोलावून तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. प्रकार हा घरच्यांना सांगितला तर आई, वडिलांना मारण्याची धमकी दिली होती.
मुलीने पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द अत्याचार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा (पोस्को) नुसार गुन्हा दाखल दिली. सहायक पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, तिचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात ग्रामसेवक यांची साक्षी महत्वाच्या ठरल्या. कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो, त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांचे मनावर पडतात. त्यामुळे आरोपीस जास्तीत -जास्त शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. सरकारी वकिलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. त्यांना पैरवी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एन. बडे यांनी सहकार्य केले.





