घोड धरणातून 20 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

निमोणे (ता. शिरूर): शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीसाठी वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण क्षेत्रात सततच्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळे धरणातून नदीपात्रात सध्या 20 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याची माहिती घोड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता महेश शिंदे यांनी दिली. नदीकाठच्या नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात जाऊ नये, खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आज दुपारी 12:30 वाजता घोड धरण प्रशासनाने सांडव्यावरून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात 7 हजार क्युसेक्सने वाढ केली आहे. या वाढीव विसर्गामुळे सध्या धरणातून नदीपात्रात एकूण 20 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, घोड नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी नदीपात्रात उतरणे, पशुधनाला नदीकाठी चरायला सोडणे किंवा इतर जोखमीचे उपक्रम टाळावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.





