Kashmir – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात रात्रभर लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली. त्यामध्ये २ जवानांना वीरमरण आले; तर आणखी २ जवान जखमी झाले. दक्षिण काश्मीरमधील कुलगामच्या जंगलात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती गुप्तचरांकडून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी १ ऑगस्टपासून व्यापक मोहीम हाती घेतली. संबंधित मोहिमेच्या प्रारंभी सुरक्षा जवानांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, त्या परिसरात आणखीही काही दहशतवादी असल्याचा सुगावा लागला. त्यामुळे सुरक्षा दलांनी मोहीम चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अधूनमधून चकमकी झडत आहेत. तशाच चकमकीला शुक्रवारच्या सायंकाळनंतर तोंड फुटले. ती चकमक रात्रभर सुरू होती. त्यामध्ये ४ जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, जखमींपैकी दोघांचे प्राण वाचू शकले नाहीत. प्रीतपाल सिंग आणि हरमिंदर सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत. सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या मोहिमेचा शनिवारी नववा दिवस होता. त्यामध्ये आतापर्यंत ९ जवान जखमी झाले आहेत. काश्मीर खोऱ्यातील चालू वर्षातील सर्वांत मोठी मोहीम म्हणून कुलगाममधील मोहिमेकडे पाहिले जात आहे. संबंधित मोहिमेवेळी जंगलव्याप्त भागात दबा धरून असलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्सचाही वापर केला जात आहे. पॅरा कमांडोही सहभागी झालेल्या मोहिमेवर वरिष्ठ पोलीस आणि लष्करी अधिकारी देखरेख ठेऊन आहेत. संबंधित मोहीम आणखी काही दिवस चालणार असल्याचे सूचित होत आहे.