Dehu News: देहूत अडीच टन निर्माल्य संकलित; २६८ स्वयंसेवकांनी लावला हातभार
Dehu News: निर्माल्यासोबतच सुमारे ३०० किलो प्लास्टिक आणि अन्य कचऱ्याचेही संकलन

देहूगाव – गणेश विसर्जनदिनी देहू नगरपंचायत हद्दीत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संरक्षणासह इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी विविध विसर्जनस्थळी उपस्थित राहून भाविकांकडून निर्माल्य स्वीकारले. तसेच निर्माल्य नदीपात्रात न टाकता त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
गणेश विसर्जनासाठी देहू परिसरात मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने देहू नगरपंचायतीच्या वतीने विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी या कुंडांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले. विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे संकलन करण्याची व्यवस्था नगरपंचायतीकडून करण्यात आली होती. त्याचवेळी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी विसर्जनस्थळी निर्माल्य संकलनाची जबाबदारी पार पाडली.
या उपक्रमात प्रतिष्ठानचे सुमारे २६८ स्वयंसेवक सहभागी झाले होते. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळपर्यंत स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी निर्माल्य संकलन केले. विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना निर्माल्य स्वतंत्रपणे देण्याचे आवाहन करण्यात आले.
दिवसभरात सुमारे अडीच टन निर्माल्य संकलित करण्यात आले. संकलित केलेले निर्माल्य वाहनाद्वारे इंदोरी येथे सेंद्रिय खतनिर्मितीसाठी पाठविण्यात आले. निर्माल्यासोबतच सुमारे ३०० किलो प्लास्टिक आणि अन्य कचऱ्याचेही संकलन करण्यात आले.
संकलित करण्यात आलेल्या निर्माल्याची पुढील प्रक्रियेसाठी स्वतंत्र वर्गवारी करण्यात आली. त्यामध्ये श्रीफळ, फळे, प्लास्टिक, पाने, फुले आणि अन्य साहित्य वेगळे करण्यात आले.
विघटनशील फुले आणि इतर सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय खतनिर्मितीसाठी स्वतंत्र ठेवण्यात आले. निर्माल्यातील प्लास्टिक आणि अन्य कचरा वेगळा केल्यामुळे त्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावणे शक्य झाले. त्यामुळे निर्माल्य संकलनासोबतच कचरा व्यवस्थापनाचा संदेशही देण्यात आला.
Shivsena UBT : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठी घोषणा





