nagar | १ लाख बालकांच्या खात्यात १९० कोटींचे अनुदान

श्रीरामपूर, ( प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत राज्यातील १ लाख ६ हजार एकल व अनाथ बालकांना १९० कोटी रुपयांचे अनुदान वाटप होत असल्याची माहिती मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी दिली.
सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील अनुदान वाटप दहा महिने रखडले होते. याबाबत साळवे यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, महसूलमंत्रीराधाकृष्ण विखे पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे, सहआयुक्त राहुल मोरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.
या सततच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्रातील १ लाख ६ हजार बालकांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे दरमहा २ हजार २५० रुपयांप्रमाणे १९० कोटी रुपयांचे अनुदान जमा होत आहे.
सुरुवातीला तांत्रिक बाबींमुळे अडखळलेल्या या लाभ हस्तांतरण प्रक्रियेला गती आल्याचे साळवे यांनी सांगितले.कोरोनापूर्वी योजनेचे १६ हजारांपर्यंत असलेले महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी आता १ लाख ६ हजारांवर पोहचले आहेत.
पाठपुराव्याला यश आल्याने समाधान
राज्यभरातील जिल्हा बालकल्याण समिती व जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे हजारो प्रस्ताव दाखल होत असताना एक ते दोन वर्षे अनुदान रखडले होते.
त्यासाठी मंत्रालय व आयुक्तालयात सतत पाठपुरावा केल्यामुळे १ लाख ६ हजार बालकांच्या बँक खात्यात ३१ मार्च २०२४ अखेरच्या अनुदानातून १९० कोटी रुपये जमा होत आहेत. पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान वाटते. -मिलिंदकुमार साळवे, मिशन वात्सल्य शासकीय समिती





