दहीहंडीतील गोंगाटाच्या 181 तक्रारी; कोथरूड, सिंहगड रस्ता परिसरातून पोलिसांना सर्वाधिक कॉल

पुणे – नुकत्याच साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण नारायण पेठेत नोंदवले गेले. तर, दुसऱ्या बाजूला शहरभरातून पोलिसांकडे 181 तक्रारी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस नियंत्रण कक्षाच्या “100′ या हेल्पलाइन क्रमांकावर 112 आणि अन्य विविध क्रमांकावर उर्वरित कॉल आले. ते सर्व दहीहंडी उत्सवादरम्यान लाऊडस्पीकरच्या वापराशी संबंधित होते. दरम्यान, यातील किती तक्रारींवर कारवाई केली, याची माहिती मात्र पोलिसांकडून मिळू शकली नाही.
शहर-उपनगरांत दहीहंडी उत्सव काळात मंडळे आणि आयोजकांनी लाउडस्पीकर आणि डीचे वापर करण्यात आला. यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ नोंदवली गेली. यामुळे उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचेही आकडेवारीवरून यापूर्वीच समोर आले आहे.
दरम्यान, पोलिसांकडे आलेल्या तक्रारींपैकी परिसरनिहाय पाहता कोथरूड- 23, सिंहगड रस्ता- 20, भारती विद्यापीठ परिसर- 14, स्वारगेट-10, विश्रामबाग-13, खडक पोलीस ठाण्याच्या हद्द- 12, विश्रांतवाडी, उत्तमनगर आणि बंडगार्डन प्रत्येकी 1 याप्रमाणे तक्रारी पोलिसांनी नोंदवल्या आहेत. या प्रकरणांत किती जणांवर कारवाई करण्यात आली, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती दिली नाही.





