Pune News: मैत्रिणीची वाट पाहत असताना १८ वर्षीय तरुणीची छेड काढून पळवून नेण्याचा प्रयत्न; आरोपीला जमावाने चोपले
Pune News: भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपीला ताब्यात

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातील सुख सागर नगर येथे १८ वर्षीय तरुणीची छेड काढून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मैत्रिणीची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणीशी आरोपीने गैरवर्तन केले. तिचा शर्ट ओढून तिला उचलण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
ही घटना शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सुख सागर नगर भाग-२ मधील विद्यानगर परिसरात समर्थ डेअरीजवळ घडली.
जितू किशोरिलाल सरोज (वय ३०, मूळ रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश; सध्या रा. कात्रज, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. तरुणी मैत्रिणीची वाट पाहत असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. तिचा शर्ट ओढून तिला उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडून मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.





