Smartphone : स्मार्टफोन बनलाय ‘आयुष्याची डिजिटल तिजोरी’
Smartphone : एका चुकीच्या क्लिकने वैयक्तिक माहिती, आर्थिक व्यवहार, गोपनीयतेवर संकट

पिंपरी – मोबाइल फोन आता केवळ संपर्काचे साधन राहिलेले नाही. नागरिकांचे संपूर्ण डिजिटल जग त्यात सामावले आहे. बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत सर्व व्यवहार मोबाइलवर होत आहेत. फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आणि वैयक्तिक संभाषणेही त्यातच साठवली जात आहेत.
त्यामुळे स्मार्टफोन हरवला किंवा चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेला, तर आर्थिक नुकसानीबरोबरच गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि तरुण वर्गाची अनेक दैनंदिन कामे मोबाइलवरच होतात.
ऑनलाइन खरेदी, तिकीट बुकिंग, शिक्षण, कार्यालयीन कामे आणि आर्थिक व्यवहार यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. स्मार्टफोनमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात वैयक्तिक माहिती असते. कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ त्यात असतात. वैयक्तिक चॅट्स आणि संपर्क क्रमांकही जतन केलेले असतात.
ई-मेल आणि सोशल मीडिया खाती मोबाइलशी जोडलेली असतात. बँकिंग आणि यूपीआय व्यवहारांची माहितीही मोबाइलमध्ये उपलब्ध असते. अनेक जण पॅनकार्ड, आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या प्रती मोबाइलमध्ये ठेवतात. त्यामुळे फोनची सुरक्षा कमी पडल्यास अनेक स्तरांवर धोका निर्माण होऊ शकतो.
सायबर चोरटे नागरिकांना विविध आमिषे दाखवतात. बँक खाते बंद होणार असल्याचे सांगितले जाते. केवायसी अपडेट करण्यास सांगितले जाते. वीज बिल थकीत असल्याचा संदेश पाठवला जातो. लॉटरी किंवा नोकरीचे आमिषही दाखवले जाते. या संदेशांसोबत संशयास्पद लिंक पाठवली जाते. लिंकवर क्लिक केल्यानंतर बनावट संकेतस्थळ उघडू शकते.
काही वेळा अनोळखी अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. अशा अॅपला अनावश्यक परवानग्या दिल्यास वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते. मोबाइलमधील प्रत्येक अॅपला सर्व परवानग्या देणे टाळावे. कॅमेरा, मायक्रोफोन, संपर्क क्रमांक आणि गॅलरीचा प्रवेश देण्यापूर्वी त्याची गरज तपासावी. अनोळखी स्रोतांवरून अॅप डाऊनलोड न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
दुहेरी सुरक्षाकवच ठेवा
मोबाइलला मजबूत कोड असावा. फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉकचा वापर करता येतो. बँकिंग, ई-मेल आणि सोशल मीडिया खात्यांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करावे. सार्वजनिक ठिकाणी यूपीआय पिन टाकताना विशेष काळजी घ्यावी. मेट्रो, बसस्थानक आणि बाजारपेठेत व्यवहार करताना स्क्रीन इतरांना दिसणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अनोळखी व्यक्तीला मोबाइल देणे टाळावे.
फसवणूक झाल्यास वेळ न दवडता कारवाई
सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाबरून न जाता तातडीने कारवाई करणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम संबंधित बँकेशी संपर्क साधून संशयास्पद व्यवहाराची माहिती द्यावी. कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंग सेवा आवश्यकतेनुसार तात्पुरती बंद करावी.
सायबर आर्थिक फसवणुकीसाठी १९३० या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. ऑनलाइन सायबर तक्रारही नोंदवता येते. व्यवहाराचे संदेश, स्क्रीनशॉट, फोन नंबर, लिंक आणि व्यवहार क्रमांक जतन करून ठेवावेत. हे तपशील तक्रारीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
मोबाइल हरवल्यास ही पावले उचला
मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर सर्वप्रथम त्याला रिमोट पद्धतीने लॉक करावे. शक्य असल्यास त्याचे लोकेशन तपासावे. बँकिंग आणि यूपीआयशी संबंधित सेवा सुरक्षित कराव्यात. ई-मेल आणि महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड बदलावे. सिमकार्ड बंद करून त्याच क्रमांकाचे नवीन सिम घेण्याची प्रक्रिया सुरू करावी. मोबाइल चोरीची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. फोनचा आयएमईआय क्रमांक उपलब्ध असल्यास तो तक्रारीत नमूद करावा.
तातडीचे उपाय : लक्षात ठेवा
- फसवणूक झाली?- १९३० वर तातडीने संपर्क करा.
- बँक खात्यातून पैसे गेले?- बँकेला त्वरित कळवा आणि संशयास्पद व्यवहार थांबवण्याची विनंती करा.
- मोबाइल हरवला? – फोन रिमोट लॉक करा आणि सिम बंद करण्यासाठी मोबाइल सेवा कंपनीशी संपर्क साधा.
- पासवर्ड धोक्यात आला?- ई-मेल, बँकिंग आणि सोशल मीडिया खात्यांचे पासवर्ड त्वरित बदला.
- संशयास्पद अॅप डाऊनलोड झाले?-
- इंटरनेट कनेक्शन बंद करून अॅप काढून टाका आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.
- पुरावे जतन करा- स्क्रीनशॉट, संदेश, फोन नंबर, लिंक आणि व्यवहाराची माहिती डिलीट करू नका.





