Sachin Ghaywal : पुणे पोलिसांची मोठी खेळी! सचिन घायवळच्या अटकेने नीलेश घायवळपर्यंत पोहोचण्याचा मास्टर की हाती
Sachin Ghaywal : सचिन घायवळच्या अटकेमुळे त्याचा भाऊ आणि कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या अंडरग्राउंड नेटवर्कचा आणि आर्थिक व्यवहारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता.

Sachin Ghaywal – सचिन घायवळच्या अटकेमुळे त्याचा भाऊ आणि कुख्यात गुंड नीलेश घायवळपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती आला आहे. सचिनच्या अटकेमुळे अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून फरारी काळात त्याचा आणि नीलेशचा संपर्क होता का?, आर्थिक व्यवहार कसे होते, टोळीचे इतर सदस्य कुठे आहेत, याचा आता तपास सुरू आहे.
दरम्यान, नीलेश घायवळविरोधात लुकआऊट नोटीस जारी असून तो परदेशात असल्याचा संशय आहे. सचिनच्या अटकेने घायवळ टोळीला मोठा धक्का बसला असला, तरी तपास यंत्रणांसमोरचे खरे आव्हान अद्याप कायम आहे. पुणे पोलिसांचे संपूर्ण लक्ष कुख्यात नीलेशचा ठावठिकाणा शोधून त्याला कायद्याच्या कचाट्यात आणण्यावर केंद्रित झाले आहे.
भावाच्या सूचनेनुसार ठिकाणे बदलली
तपासातील माहितीनुसार, नीलेश घायवळ यानेच सचिनला पोलिसांपासून दूर राहण्यासाठी वारंवार ठिकाणे बदलण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सचिनने सुरुवातीला सोलापूर परिसरात आसरा घेतला. पोलिसांना सुगावा लागताच त्याने जामखेडमार्गे थेट राजस्थान गाठले. राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील धिंगपूर या छोट्याशा गावात त्याने नवी ओळख निर्माण केली. स्थानिकांमध्ये मिसळण्यासाठी पेहराव बदलला, दाढी वाढवली आणि बाहेरील व्यक्ती असल्याचा संशय येऊ नये याची काळजी घेतली.
मोबाईल ट्रॅकिंगपासून बचाव करण्यासाठी तीन वेगवेगळे क्रमांक वापरल्याचेही तपासात स्पष्ट झाले. गुन्हेगारी विश्वात कठोर प्रतिमा असलेल्या सचिनचा चौकशीदरम्यान वेगळाच चेहरा समोर आला आहे. कुटुंबावर आलेल्या संकटांबाबत बोलताना त्याने आपल्या फरार भावाबद्दल नाराजी व्यक्त केली. गुन्हेगारीमुळे आमच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मुलांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होत आहे, अशी खंत त्याने चौकशीत व्यक्त केली.





