इस्रायलच्या नव्या हल्ल्यांमध्ये 178 ठार ! दक्षिण गाझामध्ये इस्रायलचे हल्ले वाढण्याचे संकेत

नवी दिल्ली – युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलने गाझा (gaza) पट्ट्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या हल्ल्यामध्ये शुक्रवारी किमान १७८ जण ठार झाले. या हल्ल्यात सर्वसामान्य नागरिकांची जीवितहानी होऊ नये, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. युद्धविरामासाठी दुबईमध्ये अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक संपल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.(Israel war)
शनिवारी इस्रायलने दक्षिण गाझातील खान युनिस भागामधील नागरिकांनी निघून जावे, अशी सूचना देणारी पत्रके टाकली. मात्र या पॅलेस्टिनींनी कोठे जावे, याचा कोणताही उल्लेख या पत्रकांमध्ये करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता इस्रायलकडून दक्षिण गाझामध्ये हल्ले सुरू केले जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. यामुळे दक्षिणेकडे परागंदा झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. दक्षिण गाझामधून आता निघून जाण्यासाठी कोणतीही जागा शिल्लक राहिलेली नसल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.(Israel gaza war)
इजिप्तने प्रवेश दिल्यास या पॅलेस्टिनींना इजिप्तच्या उत्तर भागातच आश्रय घ्यावा लागणार आहे. मात्र या शरणार्थ्यांचे लोंढे इजिप्तच्या हद्दीमध्ये घुसण्याबद्दल इजिप्तने चिंता व्यक्त केली आहे.
युद्धविराम संपल्यामुळे नव्याने सुरू झालेल्या हल्ल्यांमुळे इस्रायलच्या उर्वरित १३६ नागरिकांच्या सुटकेविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. युद्ध विरामादरम्यान १०५ ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. तर इस्रायलने २४० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १५ हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.




