काश्मीरमधील १७७ काश्मिरी पंडितांची सुरक्षित स्थळी बदली; निवासस्थान-कार्यालयांची सुरक्षाही वाढवली

श्रीनगर : काश्मीरमध्ये वाढत्या टार्गेट किलिंगच्या घटनांमुळे आणि काश्मिरी पंडितांमध्ये वाढती दहशत पाहता, श्रीनगरमध्ये तैनात असलेल्या 177 काश्मिरी पंडित शिक्षकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
इतकेच नाही तर भविष्यात टार्गेट किलिंगला पूर्णपणे आळा घालता यावा यासाठी काश्मिरी हिंदू निवासी वसाहती, कार्यालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय काश्मीरमधील ज्या भागात इतर राज्यांतील कामगार राहतात त्या भागातही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
या संदर्भात आदेश जारी करून मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांनी श्रीनगरच्या दुर्गम भागात तैनात असलेल्या काश्मिरी हिंदू शिक्षकांची जिल्हा मुख्यालयात बदली आणि समायोजन केले आहे. काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.
काश्मीरमधील वाढत्या टार्गेट किलिंग आणि आगामी अमरनाथ यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यासह पोलिस आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडित आणि इतर राज्यांतील कामगारांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या कडक सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या होत्या.





