IAS Transfers: राज्य शासनाने पुन्हा एकदा प्रशासकीय फेरबदल करत सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पाणी पुरवठा, पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान (IT) यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये दोन सनदी अधिकारी (IAS) यांचा विभाग बदलून त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे, तर पाच अधिकाऱ्यांना नवीन पदावर नियुक्त करण्यात आले आहे. कोणाला कोणती नवी जबाबदारी? संजय खंडारे (RR:१९९६), जे आतापर्यंत पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते, त्यांची नियुक्ती पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव (पर्यटन) म्हणून करण्यात आली आहे. परराग जैन नैनुटिया (RR:१९९६), जे सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान) होते, त्यांची बदली पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव म्हणून झाली आहे. वीरेंद्र सिंह (RR:२००६), सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव (२), यांना आता सामान्य प्रशासन विभागाचे सचिव (माहिती तंत्रज्ञान) म्हणून जबाबदारी मिळाली आहे. ई. रविंद्रन (RR:२००८), जल जीवन मिशनचे मिशन संचालक, यांची नियुक्ती सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव (२) या पदावर झाली आहे. कुणाल कुमार (RR:१९९९) यांची बदली शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे. एम. जे. प्रदीप चंद्रन (RR:२०१२), पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, यांना बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पवनीत कौर (RR:२०१४), यशदा (YASHADA), पुणे येथील उपमहानिदेशक, यांना पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नवीन कार्यभार सोपवण्यात आला आहे. या प्रशासकीय फेरबदलामुळे विविध विभागांच्या कामात अधिक गती आणि समन्वय साधण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे दिसत आहे.