Australian Cricketer Ventilator : धक्कादायक! क्रिकेट विश्वात मोठी दुर्घटना, चेंडू लागल्याने १७ वर्षीय खेळाडू गंभीर जखमी

Australian Cricketer Ventilator : ऑस्ट्रेलियात सराव सत्रादरम्यान एका १७ वर्षीय स्थानिक क्रिकेटपटूला गंभीर दुखापत झाली असून, त्याला मेलबर्नच्या रुग्णालयात लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता फर्नट्री गली येथील वैली ट्यू रिजर्व मैदानावर घडली. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट विक्टोरिया या घटनेवर लक्ष ठेवून असून, कुटुंबीयांना सर्व आवश्यक मदत पुरवत आहेत.
ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या अहवालानुसार (७ न्यूज), प्रॅक्टिसदरम्यान गोलंदाजाच्या चेंडूने थेट या युवा खेळाडूच्या मानेवर लागला. त्यामुळे तो तत्काळ मैदानावर कोसळला. सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी विलंब न करता त्याला जवळच्या मोनाश मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले असून, सध्या तो लाइफ सपोर्ट प्रणालीवर आहे.
A young cricketer is in the fight of his life after a horror incident at a match in Melbourne’s east. A ball hit the teenager in the neck, causing critical injuries. @ainsleykoch has the latest from Ferntree Gully. https://t.co/5zYfOfGqUb #7NEWS pic.twitter.com/8qCSsv4XiJ
— 7NEWS Melbourne (@7NewsMelbourne) October 29, 2025
फिल ह्यूज प्रकरणाची झाली आठवण –
या दुर्घटनेची तुलना २०१४ मधील ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूजच्या दुःखद घटनेशी केली जात आहे. सिडनी येथे शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान सीन एबॉटचा बाउन्सर चेंडू ह्यूजच्या मानेवर लागला होता. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो मैदानावर कोसळला आणि काही दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. क्रिकेट विश्व आजही ही घटना अत्यंत दुःखद मानते. आता मेलबर्नमधील या युवा खेळाडूच्या घटनेमुळे क्रिकेट समुदायात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वजण त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
हेही वाचा – Rohit Sharma : हिटमॅनने वयाच्या ३८व्या वर्षी रचला इतिहास! वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
श्रेयस अय्यर रुग्णालयात दाखल –
भारतीय संघासाठीही एक चिंताजनक बातमी आहे. वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर सिडनीतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याला अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याला सिडनीतील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, दोन्ही देशांदरम्यान ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेट विश्वातील या घटनांनी चाहत्यांना धक्का बसला आहे.





