राहाता, (प्रतिनिधी) – महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्वकांक्षी एक रुपयात पीक विमा योजनेतून राहाता तालुक्यातील ४६ हजार ८२२ शेतकऱ्यांना १६० कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून, यापैकी ४०.८५ कोटी रुपये अग्रीम रक्कमेच्या माध्यमातून यापूर्वीच शेतकऱ्यांना मिळाली आहे. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळावी यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व आर्थिक उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली. याच धर्तीवर राज्य सरकारने खरीप हंगाम २०२३ पासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. या योजनेत राहाता तालुक्यातील ४६ हजार ८२२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून २५ टक्के अग्रीम रक्कमेपोटी शेतकऱ्यांना ४०.८५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. यामध्ये सोयाबीन आणि मका या पीक उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, पीक कापणी प्रयोग आधारित एकूण १६०.१० कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असून, विमा कंपनी व राज्य शासना मार्फत विमा रक्कमेचा उर्वरित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. यावर्षीही राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून या योजनेत सहभगी होण्याचा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.