Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला ‘या’ देशाकडून धोका; अमेरिकेच्या गुप्तचरांनी दिला इशारा

Donald Trump – अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला इराणकडून धोका असल्याचे अमेरिकेच्या गुपत्चरांनी म्हटले आहे. ट्रम्प यांची खरोखर आणि निश्चित हत्या केली जा शकते.
अमेरिकेत गोंधळ माजवण्याच्या उद्देशाने ही हत्या केली जाऊ शकते, असे गुप्तचर संस्थांनी ट्रम्प यांना कळवले आहे. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे संचालक स्टीव्हन चेउंग यांनी मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली.
यापूर्वी ट्रम्प यांच्या हत्येचे दोन प्रयत्न अलिकडच्या काळात होऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा विशेष गांभीर्याने घेतला जातो आहे. यापूर्वीच्या हल्ल्यांच्या तपासादरम्यान समन्वयातून ही नवीन माहीती उजेडात आली आहे.
दिनांक १३ जुलै रोजी ट्रम्प यांच्यावर पेनसिल्वेनियामध्ये पहिल्यांदा हल्ला झाला होता. तेंव्हा एका युवकाने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला घासून गेली होती. त्यानंतर १५ सप्टंबर रोजी फ्लोरिडा येथील आंतरराष्ट्रीय गोल्फ क्लबमध्ये दुसरा हल्ला करण्यात आला होता.
या गोल्फ क्लबबाहेर एका बंदुकधाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांच्या हत्येच्या तयारीत असताना अटक केली होती. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्याशी होणार आहे.





