नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेसने ‘वंदे मातरम्’चे काही भाग बदलले आणि त्यामुळेच देशाला फाळणीलाही सामोरे जावे लागले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष होते, तेव्हा मुस्लिम लीगच्या दबावामुळे ‘वंदे मातरम्’च्या काही भागांमध्ये बदल करण्यात आले. “काँग्रेस ‘वंदे मातरम्’च्या विभाजनावर झुकली, म्हणूनच तिला एक दिवस भारताच्या फाळणीवर झुकावे लागले,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. ‘तुष्टीकरणाचे राजकारण आजही सुरू’ मोहम्मद अली जिन्ना यांनी ‘वंदे मातरम्’ विरोधात आवाज उठवल्यावर, नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून जिन्ना यांच्या भावनांशी सहमत असल्याचे दर्शविले होते, अशी माहिती पंतप्रधानांनी सभागृहाला दिली. यामागचे कारण म्हणून काँग्रेसने ‘सामाजिक सलोख्या’चा हवाला दिला होता, मात्र पंतप्रधानांनी याला ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ ठरवले आणि काँग्रेसची धोरणे आजही तशीच असल्याचे सांगितले. ‘वंदे मातरम्’ प्रेरणास्रोत – पंतप्रधानांनी स्पष्ट केले की ‘वंदे मातरम्’ हे केवळ राजकीय संघर्षाचे प्रतीक नव्हते, तर ते स्वातंत्र्य लढ्याचा एक महत्त्वाचा ‘मंत्र’ होते. इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण वापरून बंगालला त्याचे प्रयोगस्थळ बनवले. त्यांनी पुढे सांगितले की, ‘वंदे मातरम्’ला ५० आणि १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देशाला कठीण परिस्थितीतून जावे लागले. १०० वर्षांनिमित्त देश आणीबाणीच्या बेड्यांमध्ये जखडला गेला होता आणि संविधानाचे उल्लंघन झाले होते. ‘वंदे मातरम्’ने देशाला उभे केले आणि आजही ते ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वदेशी आंदोलना’ची प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसकडून पलटवार – पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर काँग्रेसने तात्काळ पलटवार केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधानांना विचारले की, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांनी जिन्ना यांची प्रशंसा का केली होती, याचे उत्तर त्यांनी द्यावे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी १९४० च्या दशकात जिन्ना यांच्यासोबत बंगालमध्ये युती केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. रमेश म्हणाले, “पंतप्रधान इतिहासाला तोडून-मोडून सादर करतात, पण ते या प्रश्नांची उत्तरे देतील का?” बंकिम चंद्र चटर्जी यांनी सुरू केलेला प्रवास – पंतप्रधान मोदींनी सभागृहाला आठवण करून दिली की, ‘वंदे मातरम्’चा प्रवास १८७५ मध्ये बंकिम चंद्र चटर्जी यांनी बंगालमधून सुरू केला होता. स्वातंत्र्यापूर्वी महापुरुषांचे स्वप्न ‘स्वतंत्र भारत’ होते, तर आजच्या पिढीचे उद्दिष्ट ‘समृद्ध आणि विकसित भारत’ निर्माण करणे आहे.