15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम बापाकडून अत्याचार

संगमनेर – चार वर्षांपूर्वी अकोले तालुक्यातील शिरपूंजे येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चक्क तिच्या नराधम पित्यानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. आरोपीविरोधात संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा निकाल आज लागला असून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर.आर. कदम यांनी आरोपी पित्याला दहा वर्षांच्या कारावासासह 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबतची हकिकत अशी की, अकोले तालुक्यातील शिरपूंजे येथे एक आदिवासी कुटुंब वास्तव्यास असून शेतमजूरी करतात. चार वर्षांपूर्वी नराधम बाप मुलीवर अत्याचार केला. या प्रकाराने त्या छोट्याशा मुलीला प्रचंड वेदना होवू लागल्याने ती रडू लागली. तिच्या आई आणि दोन भावडांना जाग आली. आणि तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. कालांतराने पीडिता गर्भवती राहीली, मात्र बापाच्या धाकाने घरातील कोणीही बाहेर काही बोलण्यास धजावत नसल्याने पीडितेच्या पोटातील गर्भ सात महिन्यांचा झाला. त्यामुळे तिला वेदना होवू लागल्याने अखेर तिच्या आई व भावांनी तिला एका खासगी डॉक्टरांकडे नेले व औषधोपचार घेतले. डॉक्टरांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने डॉक्टरांनी अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेला घडला प्रकार कळविला.
या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच 12 फेब्रुवारी 2018 रोजी स्नेहालय संस्थेचे हर्षदा गोले, संतोष धर्माधिकारी व अखील पठाण हे तिघे पीडितेच्या घरी आले व त्यांनी त्या कुटुुंबाला धीर देत राजूर पोलीस ठाण्यात आणले. आपल्या नराधम पित्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.त्यानंतर राजूरचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी व उपनिरीक्षक ए.एन.उजागरे यांनी त्या नराधमास गजाआड करीत घटनेचा बारकाईने तपास करुन संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश आर.आर.कदम यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले.
सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी उच्च न्यायालयातील विविध दाखले देत जोरदार युक्तिवाद केला.तो ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या प्रकरणात 10 वर्षांचा सश्रम कारावास व 15 हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्षाचा कारावास, पोस्कोच्या कलम 4 अंतर्गत 10 वर्षांचा कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची कैद, कलम 5 (एन) सह 6 नुसार 10 वर्ष कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षांचा कारावास, कलम 5 (।)(।।) 6 नुसार 10 वर्ष कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली. खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून बी.जी.कोल्हे यांनी कामकाज पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, पो.हे.कॉ.प्रवीण डावरे, चंद्रकांत तोर्वेकर, महिला पोलीस स्वाती नाईकवाडी, दीपाली दवंगे व कोर्ट ऑर्डली सारीका डोंगरे यांनी सहाय्य केले.





