टायर गोडाऊनच्या आगीत 15 लाखांचे नुकसान

कराड – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत गोटे, ता. कराड येथे जुन्या टायरच्या गोडाऊनला शॉटसर्किटमुळे काल (दि. 18) रात्री 10.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीनंतर गोटे व मुंढे या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
याबाबत माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनलगत गोटे येथे हॉटेल फर्नच्या पुढे फिरोज मुजावर यांचे स्टार टायर्स नावाचे दुकान आहे. तेथे जुने, स्क्रॅप झालेले टायर कापून कंपनीला पाठवण्यात येतात. फिरोज मुजावर हे नेहमीप्रमाणे गुरुवारी (दि. 18) रात्री 10 वाजता दुकान बंद करून घरी गेल्यानंतर 10.30 च्या सुमारास दुकानाला आग लागल्याची माहिती त्यांना फोनवरून मिळाली. दुकानासमोर मोकळ्या जागेत रचलेल्या टायरच्या ढिगाला आग लागल्याने आकाशात धुराचे लोट उठले होते. आगीची धग महामार्गापर्यंत जाणवत होती.
महामार्गावरील प्रवासी आणि परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली होती. कराड पालिका व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. पहाटे तीन वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आली. या आगीत गोडाऊनमधील सर्व टायर जळून सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.





