इचलकरंजीत यंत्रमागधारकाकडून 15 लाखांची वीजचोरी; गुन्हा दाखल

कोल्हापूर – जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील यंत्रमागधारक वीजग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून 45 हजार 847 युनिटची वीजचोरी केली असून त्याची रक्कम 15 लाख 13 हजार 865 रूपये इतकी होते. सदर वीजचोरी प्रकरणी जागा मालक शोभा खोत व वीजवापरकर्ते प्रमोद गौंडाजे यांचेविरूध्द (दि.14 जानेवारी रोजी) जुना राजवाडा, कोल्हापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.
महावितरणच्या भरारी पथकाने 3 डिसेंबर 2021 रोजी इचलकरंजी शहरातील लघुदाब औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकाच्या वीज मीटर व विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष तपासणी केली. वीज मीटरच्या डिस्प्लेवरील करंट व टोंगटेस्टरच्या सहाय्याने मीटरला येणाऱ्या केबलचा करंट तपासला असता त्यात तफावत आढळून आली. मीटर अक्युचेकच्या सहाय्याने वीज मीटरची तपासणी केली असता ते अनुक्रमे -28.66 व -28.55 टक्के इतक्या संथगतीने फिरत असल्याचे निष्पन्न झाले.
मीटर टर्मिनलचे लीड सिल तुटलले दिसून आले. आर फेजच्या सीटी टर्मिनल मीटरला आवळण्यासाठीचे दोन स्क्रु नसल्याचे आढळून आले. त्यामुळे इनकमिंग टर्मिनलच्या आर फेजला 37.77 ॲम्पिअर करंट असताना मीटरच्या डिस्प्लेवर आर फेजचा करंट शुन्य दाखवत असल्याचे दिसून आले. या प्रकारे वीजमीटरमध्ये छेडछाड करून वीजग्राहकाने वीजवापराची नोंद होणार नाही, अशी योजना केली होती. सदर मीटर ग्राहक व पंचांच्या स्वाक्षरीने सीलबंद करण्यात आले.
सदर वीजचोरीच्या निर्धारीत 12 महिने कालावधीत 45 हजार 847 युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम 15 लाख 13 हजार 865 रूपये व तडजोड रक्कम 2 लाख 20 हजार रूपये इतकी आहे. ग्राहकास वीजचोरी व दंडाचे बिल दिल्यानंतर विहीत मुदतीत ती रक्कम भरणा करण्यात आली नाही. सदर वीजचोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा 2003, कलम 135 अन्वये संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश मगर, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी वर्षा जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कोरवी यांनी सहभाग घेऊन ही मोहिम यशस्वी केली.




