जिल्ह्यात लंपी स्किनने 15 जनावरांचा मृत्यू

सातारा – जिल्ह्यात लंपी स्किन त्वचा रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आठ तालुक्यांतील 51 गावांमध्ये 15 जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर 321 जनावरांना लंपी स्किनची बाधा झाली असून 64 जनावरांवर उपचार करुन ती बरी झाली आहेत. जिल्ह्यात एकूण 81 हजार 742 जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
जिल्ह्यात लंपी स्किनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कराड, फलटण, सातारा, खटाव, कोरेगाव, पाटण, माण, खंडाळा या आठ तालुक्यांमध्ये लंपी रोगाचा संसर्ग वाढला आहे. वाघेरी (ता. कराड) येथे लम्पी स्किनचे पहिले बाधित जनावर आढळले. सोमवारअखेर 15 जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 242 जनावरांवर उपचार करण्यात येत आहेत. लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरातील 270 गावांमधील जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात एक लाख 10 हजार 976 जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. आजअखेर 81 हजार 742 जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून एक लाख 31 हजार 900 लस उपलब्ध असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.





