Pune News | ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ टोल फ्री हेल्पलाइन..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांना मदतीचा हात देणारी एल्डर लाइन १४५६७ ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन टेन्शन फ्री सेवा ठरली आहे. लाखो वृद्ध आज या सेवेचा लाभ घेत आहेत. केंद्राच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने संपूर्ण भारतभर ही सुविधा निर्माण केली आहे. यावर आजपर्यंत चार लाखांपेक्षा अधिक कॉल्स आले असून, त्यातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रकरणांचा यशस्वी निकाल लावण्यात आला आहे. काही निकालाच्या उंबरठ्यावर आहेत, त्यामुळे या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मुले परदेशात असतात आणि त्यांचे वृद्ध माता- पिता भारतात असतात. त्यांना मदतीची आवश्यकता असते, स्मृतिभ्रंश झालेले आजोबा अचानक घरातून निघून जातात आणि त्यांना पुन्हा घर सापडत नाही किंवा पत्ता आठवत नाही, काही वृद्धांना घरचेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सोडून जातात, अपत्यांकडून माता- पित्यांना घरातून बाहेर काढले जाते, अशा एक ना अनेक घटना वृद्ध नागरिकांबाबत घडतात. अशा वृद्धांच्या मदतीसाठी ही एल्डर लाइन बनवण्यात आली आहे.
अशी होते मदत..
ही हेल्पलाइन जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असून, ही सेवा मोफत चालवली जाते. या हेल्पलाइनच्या माध्यमातून वृद्धाश्रम, आरोग्यविषयक माहिती, पेन्शन संबंधित सल्ला, सरकारी योजना, कायदेविषयक मार्गदर्शन, भावनिक आधार, कौटुंबिक वाद निवारण, पोलिसांची मदत आणि समन्वय, हरवलेल्या अथवा सापडलेल्या ज्येष्ठांचा अथवा कुटुंबीयांचा शोध अशा सेवा पुरवल्या जातात.
वर्षातून फक्त दोनच सुट्ट्या
सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत आठवड्यातील सातही दिवस ही सेवा मोफत चालवली जाते. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि दोन ऑक्टोबरला सुटी असते. ज्येष्ठ नागरिक www.elderline.dosje.gov.in या संकेतस्थळावरही संपर्क साधू शकतात.





