Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

नवी दिल्ली – भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्र कमालीच्या वेगाने वाढत आहे. एप्रिल महिन्यामध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या आठ टक्क्यांनी वाढून 143.16 लाख इतकी भरली आहे. मे महिन्यामध्ये एक आठवडा देशाच्या पश्चिम भागातील अनेक विमानतळे बंद होती. त्यामुळे मे महिन्यात विमान प्रवासावर काही प्रमाणात नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
एकूण प्रवासी संख्येत इंडिगो कंपनीचा वाटा 64%, एअर इंडियाचा वाटा 27%, आकासा एअर कंपनीचा वाटा 5%, स्पाइस जेट कंपनीचा वाटा 2.6 % असल्याचे नागरी विमान वाहतूक संचलनालयाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 575.13 लाख नागरिकांनी देशात विमानाने प्रवास केला. गेल्या वर्षी या कालावधीत 523.46 लाख नागरिकांनी विमान प्रवास केला होता. यामध्ये 9.87% वाढ झाली आहे. वेळा पाळण्यामध्ये इंडिगो कंपनी आघाडीवर असून या कंपनीची 80 टक्के विमाने वेळेवर निघाली. आकासा आणि एअर इंडिया कंपनीची 77% विमाने वेळेवर निघाली असल्याचे सांगण्यात आले.
इंडिगो कंपनीचा वाढला नफा –
इंडिगो कंपनीला चौथ्या तिमाहीत तब्बल 3,068 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. या कालावधीत विमानाने प्रवास करणार्यांची संख्या वाढल्यामुळे आणि विमानाच्या इंधनाचे दर माफक असल्यामुळे कंपनीच्या नफा ऐवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर दहा रुपयाचा लाभांश जाहीर केला आहे. चौथ्या तिमाहीत इंडिगो कंपनीच्या विमानाने तब्बल 31.9 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती या कंपनीने शेअर बाजाराला कळविली आहे.





