हरियाणातील नूह हिंसाचार प्रकरणी 141 जणांना अटक, तर 55 एफआयआर दाखल

हरियाणा – हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सोमवारी झालेल्या हिंसाचार आणि दंगलीच्या संदर्भात 141 लोकांना अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणी एकूण 55 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी माहिती दिली.दोन गटांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात 2 पोलिस होमगार्डसह 6 जण ठार झाले आहेत तर अन्य 88 जखमी झाले आहेत.
दरम्यान, गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की त्यांनी 27 एफआयआर दाखल केले आहेत आणि 38 आरोपींना अटक केली आहे, नूहमधील संघर्षानंतर गुरुग्राम आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचे लोण पसरले आहे. अजूनही त्या राज्यात तुरळक प्रमाणात हिंसक प्रकार सुरूच आहेत.
हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी या हिंसाचारामागे मोठा कट असल्याचा आरोप केला असून दोषींना सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, जो कोणी हिंसाचाराचा मास्टरमाईंड असेल त्याला त्याची किंमत चुकवावीच लागेल. दंगलखोरांना सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करावी लागेल असेही विज यांनी स्पष्ट केले.
राज्य पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय निमलष्करी दल पुरेशा संख्येने तैनात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर कोणताही आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक मजकूर पोस्ट प्रकरणी आम्ही एक चौकशी समिती स्थापन केली आहे, जी सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे, असेही ते म्हणाले.





