पुणे जिल्हा | 14 हजार 704 हेक्टर क्षेत्रावर होणार सुपा मंडलाअंतर्गत उद्दिष्ट

मोरगाव, (वार्ताहर)- सुपा कृषी मंडल अधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या २७ गावांमध्ये खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे. या हंगामात प्रत्येक शेतकऱ्यांना खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असून यावर्षी 14 हजार 704 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट असल्याची माहिती सुपा प्रभारी मंडलाधिकारी बी. एच. लोदाडे यांनी सांगितले.
बारामती तालुक्यातील जळगाव सुपे, जळगा क.प., भिलारवाडी, मोढवे, सायंबाचीवाडी, पळशी मासाळवाडी, तरडोली, मोरगाव, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, काळखैरेवाडी,खंडू खैरेवाडी, सुपा, दंडवाडी, नारोळी, कोळोली, पानसरेवाडी, बाबुर्डी, माळवाडी, काऱ्हाटी, चांदगुडेवाडी, वढाणे, कुतवळवाडी ही गावे सुपा कृषी मंडल कार्यालयाअंतर्गत येतात.
तालुक्याच्या पश्चिम भागातील ही गावे काळ्या कसदार जमीनीसाठी ओळखली जातात. खरीप हंगाम हमखास उत्पन्न मिळून देणारा म्हणून ओळखला जातो. बाजरी, सूर्यफूल, मका, भुईमूग, मूग, मटकी, हुलगा आदी पिके घेतली जातात. चारा पिकामध्ये कडवळ मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन नांगरुन, कोळपून पेरणीसाठी सज्ज केली आहेत. या गावांमध्ये एकूण ३७ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. पैकी ३१ हजार ६९४ हजार क्षेत्र लागवड योग्य आहे. यापैकी १४ हजार ७०४ हेक्टर जमिनीवर पेरणीचे उद्दिष्ट कृषी खात्यामार्फत ठेवले आहे.
जमिनीत चांगली ओल आल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी व दुबार पेरणीचे संकट टाळावे तसेच बीजप्रकीया करुनच पेरणी करावी व उतार जमीनीस आडवी पेरणी करावी – प्रसाद तावरे, सहायक कृषी अधिकारी, मोरगाव.





