श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आफताबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली – आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हत्येचा आरोप असलेला आणि सध्या तिहार तुरुंगात असलेला आफताब अमीन पूनावाला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात सहभागी झाला. दिल्लीच्या साकेत कोर्टाने आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. दिल्ली पोलिसांनी न्यायालयीन कोठडी वाढवण्याची मागणी केली आणि तपास सुरू असल्याचे सांगितले.
पोलिसांनी पूनावालाला 12 नोव्हेंबरला अटक केली होती, त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. 17 नोव्हेंबर रोजी पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली. 22 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने पुन्हा आरोपी आफताब पूनावाला याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी त्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
आफताब अमीन पूनावाला (वय 28) याने मेहरौली पोलिसांना खुले आव्हान दिले आहे की, मी श्रद्धाला मारले आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर शरीराचे अवयव आणि हत्यारे जप्त करून दाखवा. हे आव्हान तो पुन्हा पुन्हा देत आहे. आरोपीच्या या आव्हानाबाबत दक्षिण जिल्ह्याचे पोलिस अधिकारीही हतबल झाले आहेत. त्याचा आत्मविश्वास पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मेहरौली पोलिसांनी आरोपीला पकडले तेव्हा आफताबने श्रद्धाला आपणच मारल्याचे सांगितले होते. हिम्मत असेल तर शरीराचे तुकडे जप्त करून दाखवा. हे आव्हान तो आता सातत्याने देत आहे. पोलिसांना अद्याप श्रद्धाचे डोके आणि धड सापडलेले नाहीत.
छतरपूरच्या जंगलातून सापडलेला जबडा आणि 100 फूट रस्त्यावरून सापडलेला मृतदेह या महिलेचा मृतदेह असल्याचे समजते. छिन्नविछिन्न मृतदेह बाहेर काढण्यासाठी वापरलेली साधने पोलिसांना अद्याप सापडलेली नाहीत. मात्र, पोलिसांनी किचनमधून पाच चाकू जप्त केले. याचा वापर आरोपींनी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी केला होता.





