Satara | शिवकृपा सहकार मॅरेथॉनमध्ये १३०० स्पर्धक सहभागी

नागठाणे (प्रतिनिधी)- शिवकृपा सहकारी पतपेढीच्यावतीने रविवारी दि २० रोजी सातारा येथे झालेल्या शिवकृपा सहकार मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एक हजार ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेची सुरुवात शाहू स्टेडियम येथून सकाळी साडेसहा वाजता झाली. यावेळी अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, सहायक निबंधक जे. पी. शिंदे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण,
संस्थापक उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी व सर्व संचालकांनी यांनी सहकार ध्वज दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरूवात झाली. ही स्पर्धा करंजे, मोळाचा ओढा मार्गे मेढ़ा रस्ता व त्याच मार्गाने पुन्हा शाहू स्टेडियमवर समाप्त झाली.
स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून स्पर्धेमध्ये धावपटूंसाठी जागोजागी पाणी, चिक्की, प्रथमोपचार आदींची व्यवस्था करण्यात आली होती.
हलगीच्या कडकडाटात धावपटूंना प्रोत्साहन दिले जात होते. सहकाराला अध्यात्माची जोड देत शिवकृपा काम करत आहे.
त्यामुळे ‘एक धाव शिवकृपासाठी, शिवकृपाची धाव सहकारासाठी’ या संकल्पनेच्या आधारित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उत्तम आरोग्यासाठी व्यायाम ही काळाची गरज आहे. आणि प्रत्येकाने आपल्या तब्बेतीची काळजी घेताना दैनंदिन धावणे गरजेचे आहे, असा संदेश या मॅरेथॉनमधून देण्यात आला.
वारीची संकल्पना घेऊन वेशभूषा केलेले काही स्पर्धक हातामध्ये सहकाराचा ध्वज घेऊन सहभागी झाले होते
स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभाप्रसंगी श्रीकृष्ण वाडेकर, जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर, कर्मवीर भाऊराव पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव मस्के, प्राचार्य डॉ. विठ्ठल सावंत, यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे,
प्रिती काळे, संजय जाधव, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन संचालक विनोद कुलकर्णी, जयदीप चव्हाण, राजेश निबाळकर, प्रगती जाधव पाटील, अरुण देसाई, अमर जाधव, संजय शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीकृष्ण वाडेकर, ज्ञानदेव मस्के, चंद्रकांत वंजारी, गोरख चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. सुनील मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेतील विजेते…
या मरेथॉन स्पर्धेमध्ये वयोगटानुसार पुरुषांमध्ये प्रतिक दळवी, श्रीकांत इंगळे, सचिन निकम, विठ्ठल अरगडे यांनी तर महिलांमध्ये अनिका जगदाळे, यश्वदा मोरे, स्मिता शिंदे, पुष्पा भोईटे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले.





