पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवले

जांबुत : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने रोहन विलास बोंबे या तेरा वर्षांच्या मुलांवर हल्ला करत ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पिंपरखेड परिसर पुन्हा हादरला आहे.
पिंपरखेड येथे दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास बोंबे (वय १३ वर्ष ) हा घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत असताना हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून ऊसाच्या शेतात ओढत नेले.
दरम्यान, मुलगा दिसत नसल्याने आई वडिलांनी तत्काळ शेजारील लोकांना बोलावून शोध घेतला. तरूणांनी जोराचा आरडाओरड करत जवळच्या ऊसाच्या शेतात शोध सुरू केला. यावेळी त्यांना रोहन मृतावस्थेत आढळला.
अतिशय ह्रदयद्रावक घडलेल्या या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वनविभागाची गाडी पलटी करून पेटवून दिली. वीस दिवसांत तिसरी घटना घडली असून या घटनेने पिंपरखेड परिसरातील ग्रामस्थ आक्रमक पवित्र्यात दिसून येत आहेत. दोन घटना घडूनही वनविभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवले
रोहनच्या मृत्युच्या घटनेने पिंपरखेड ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठोस निर्णय झाल्याशिवाय मुलाचे शवविच्छेदन करण्यात येणार नाही. दोन वेळा रास्तारोको आंदोलन करून संवेदनाहीन वनविभाग व शासनाला जाग येत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवून तीव्र संताप व्यक्त केला.





