Ukraine Russia War : पिंपरी-चिंचवड, मावळमधील 13 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

पिंपरी – सद्यस्थितीत रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच मावळ तालुक्यातील एकूण 13 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये सर्वाधिक दहा विद्यार्थिनींचा व तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बहुतांशी हे सर्व विद्यार्थी उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले असल्याची बाब समोर आली आहे.
रशिया-युक्रेन युद्धात सुमारे 16 हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील सर्व हवाई क्षेत्र बंद करण्यात आले असुन, रशिया व युक्रेनमधील युद्धाचा सर्वच राष्ट्रांनी धसका घेतला आहे. या ना त्या कारणास्तव युक्रेनमध्ये वास्तव्यास असलेले पुणे जिल्ह्यातील जवळपास 33 विद्यार्थ्यांची नावे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील 12 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये बहुतांशी विद्यार्थी असून, उच्च शिक्षणासाठी हे विद्यार्थी त्याठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता मात्र वाढली आहे. भारतापेक्षा कमी खर्चात वैद्यकीय व अन्य क्षेत्रातील उच्च शिक्षण मिळत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा कल युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यावर आहे.
त्यामुळे उच्च शिक्षणाच्या विविध प्रवाहांमध्ये हे भारतीय विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. मात्र, काही दिवसांतच रशिया व युक्रेनमधील परिस्थिती तणावाची होऊन, एकदम बॉम्ब हल्ल्यावर ही बाब पोहचल्याने, याठिकाणच्या भारतीय व अन्य परकीय नागरिकांना मायदेशी परतण्याची संधीदेखील मिळू शकली नाही. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
याठिकाणी घेताहेत वैद्यकीय उच्च शिक्षण
डीनप्रो युनिव्हर्सिटी, ओडेसा सिटी ऑफ युक्रेन, खारकीव नॅशनल मेडीकल युनिव्हर्सिटी, खारकीव ओब्लास्ट, युक्रेन इन टेर्नोपील नॅशनल मेडीकल युनिव्हर्सिटी, ओडेसा नॅशनल मेडीकल युनिव्हर्सिटी, तरस शवचेन्को, युक्रेन, नॅशनल प्रोव्हुज युनिव्हर्सिटी, विन्न्यात्स्या, युक्रेन.





